()
कणखर वरून मी पण खोलात ठेच आहे
परिपक्व होत गेलो ते सूत्र हेच आहे
माझे शहर बदलले झाले पुढारलेले
जातीनिहाय वस्ती अजुनी तिथेच आहे
देशाभिमान आहे घुसमट किती तरीही
दोन्ही खरेच आहे भलताच पेच आहे
जमिनी विकून पैसा मिरवून काय झाले
तिरडीवरी अखेरी उघडे मढेच आहे
ओलांड रेष आता नशिबास कोसण्याची
त्या उंबर्यापुढेही जगणे बरेच आहे
प्रेमात मी पणाचे निर्माल्य होत गेले
अस्तित्व सर्व माझे आता तिचेच आहे
अंगण तुझे जरीही गंधाळते फुलांनी
बूंधा अजून माझ्या हद्दीमधेच आहे