()
कोणती का लस असो टोचून घ्यावी
जीवनाची नस तिला माहित असावी
मी शहर सोडायचा निश्चय करावा
आणि का संचारबंदी लागु व्हावी
रोज चाकोरीत जगणे व्यर्थ आहे
व्यर्थ जगण्याची नवी फॅशन निघावी
फासला शेंदूर त्यांनी कातळाला
देव ही संकल्पना माहित नसावी
चार भिंती आणि आपण कोंडलेले
श्वास घेण्याची जणू शिक्षा मिळावी
मी तिला विसरायचा निश्चय करावा
एकदा आतून ती ही गलबलावी
भेट व्हावी आमुची वृद्धापकाळी
आणि माझी सुप्त आकांशा चळावी
प्रेम हे डबके नव्हे आकर्षणाचे
आणि ही मॅच्युरिटी विरहात यावी
एक इच्छा आज सुद्धा प्रबळ आहे
ठेच लागावी मला.. ती कळवळावी
सारखे नाहीत आता क्लेश अपुले
नाळ तुटलेली कशी आता जुळावी