()
त्याला दुधाच्या गं न्हाणी
अन् रूपयांची नाणी
त्याला भरजरी शेला
सोन्या मोतियांच्या माळा
माझ्या सुकल्या ओठांवरी
येक टिपूस पडना
कापड इतुक फाटलं
किती झाकलं कळना
त्याला दाविताती रोज
नैवेद्यासी गोड पुरी
पंचपक्वान्नचं ताट
तो खाईना ते जरी
माझ्या पोटात आगीचा
डोंब असे उसळला
एक खरकट्याचा कण
अमृतावरी गे भासला
त्याचा इटाळ गे माये
कसा चालतो भटासी?
माझ्या सावलीपायी गे
गंगा डोईवर घेसी
येका दगुडाचा बघ
कसा होतो थाटमाट
तो मुका अन् बहिरा
तरी त्याला दंडवत
फुटक्या कावडीपरीस
माझं नशीब गे फुटकं
मानुसाचा जल्म माझा
हेच खरं गे पातक
पुढल्या जल्मात माये
येक दगुड होईन
गाभाऱ्यात बसूनशान
देवपण मी भोगीन
मानूस, मानसात नाही
देव दगडात पाहतो
समाजाची रीत जशी
तसा चालत राहतो
__ कु. नेहा उपाध्ये