खेळासाठी धडपड कित्ती संध्याकाळी घाई
सवंगड्यांसह आनंदाला फारच भरते येई
चिडणे रडणे रुसवे फुगवे प्रेमही होते न्यारे
आता नुसत्या उरल्या गोष्टी हरवत गेले सारे
हाका मारी रोज सकाळी शाळेकडल्या वाटा
परिपाठाला पुढे जायला गौरव होता मोठा
वात्स्यल्याचे सागर होते गुरु शिष्याचे नाते
रोजच आता शुष्कपणाचे गरगर फिरते जाते
रानामध्ये चिंचा बोरे पाटामधले पाणी
ओट्यापुढली दंगा मस्ती तोंडी होती गाणी
झोपी जाता गगनाखाली कुशीत होता वारा
आता तशीच इच्छा होते दिसण्या तुटका तारा
अज्ञानाची बाधा होती जिज्ञासेला संधी
उत्साहाचे वादळ होते थकण्यासाठी बंदी
चिंता नव्हती रोजरोजची नव्हती भीती पीडा
जगण्यासाठी आता केवळ श्वास आतला सोडा
कशी कळेना वाढत गेली आयुष्याची त्रिज्या
किती स्मरावी स्मरतच जावी बालपणीची मज्जा
ग्रहण लागले ह्या वृत्तीला निघून गेली दृष्टी
पहा गडयांनो आज अकाली जवान झाली सृष्टी
मात्रावृत्त – लवंगलता
८+८+८+४